गतवर्षीच्या तुलनेत पाऊस पिछाडीवर; हळव्या जातीचे भातपीक धोक्यात

रत्नागिरी:- यंदाच्या खरिपात सक्रिय होण्यास विलंब लावणार्‍या पावसाने आता ऐन पिक तरारुन येण्याची तयारी असाताना पाठ फिरविली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील हळव्या जातीच्या भातबियाण्यांना बसण्याची भीती आता शेतकर्‍यांमध्ये आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणार्‍या पावसाची सरासरी घटली असून, आता गतवर्षापेक्षा पाऊस 500 ते 700 मि.मी ने पिछाडीवर पडला आहे.

जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत सरासरी 2 हजार 525 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टपर्यंत सरासरी 2667 मिलीमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत 2961 मीमीची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी पावसाला अद्याप सरासरी गाठता आली नाही. त्याचे परिणाम आता भातशेतीवर दिसू लागले आहेत.

जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे बहुतांश भगाात लावण्यांना पंधरा दिवस उशिराने सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याने करपा, पाने गुंडाळणारी अळीसारखे रोग दिसू लागले आहेत. तसेच उशिराने लावलेल्या हळव्या जातीच्या खाचरातील भातरोपांवर परिणाम होणार आहे. दोन दिवसांपूर्वी हलका पाऊस पडत होता. आता रात्री एखादी सर पडून जात आहे. यामुळे भातशेतामध्ये ओलावा होत आहेे. पण दिवसा पुन्हा कडकडीत उन पडल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. सध्या हळव्या भाताच्या रोपांना फुलोरा येण्याची स्थिती आहे. या वेळी जर पाऊस व्यवस्थित पडला नाही तर शेतकर्‍यांना मोठा फटका बसू शकतो.