रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा टेंपो उलटून झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. जखमींना तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दीपाली सुनील शिंदे (३०), संगीता संदीप साळुंखे (३०), तुकाराम मारुती शिंदे (२८) व राणी संदीप साळुंखे (२०, रा. सर्व साळवी स्टॉप रत्नागिरी) अशी जखर्मीची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास भंडारपुळे हेलिपॅडजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी हे गुरुवारी मित्रपरिवारासह टेंपोने गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले होते. दुपारी दर्शन घेऊन ते पुन्हा रत्नागिरीकडे जात होते. साडेतीनच्या सुमारास ते भंडारपुळे हेलिपॅड याठिकाणी आले असता चालकाचा टेंपोवरून ताबा सुटल्याने टेंपो रस्त्याकडेला उलटला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व गणपतीपुळे देवस्थानची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांच्या मदतीने टेम्पोमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. यातील चौघांना दुखापत झाली होती. त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात चालक प्रफुल्ल पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.