चतुर्थीला पाच हजार ग्रामस्थांनी थेट गाभाऱ्यात जाऊन घेतले दर्शन
रत्नागिरी:- पाचशे वर्षांपुर्वीची ’एक गाव एक गणपती’ची परंपरा गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जपत यंदाही गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. 19) श्रीं च्या मंदिरात गाभार्यात जाऊन स्पर्श दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासून स्थानिकांसह परजिल्ह्यातील सुमारे पाच हजारहून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
तिर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे घरोघरी गणेशाची पार्थिव मूर्ती न आणता भाद्रपदी गणेशोत्सव स्वयंभू श्री गजाननाच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो; आज भाद्रपदी गणेशचतुर्थीनिमित्त येथे स्थानिक ग्रामस्थांना धुतल्या वस्त्रानी गाभार्यामध्ये जाऊन स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेता येते. आज पहाटे 5 वाजल्यापासून ’श्रीं’ च्या स्पर्श दर्शनाची सुरुवात पहाटे 4.30 वाजल्यापासून झाली. स्थानिक ग्रामस्थांनी दर्शन रांगांमध्ये उभे राहून हजेरी लावली. स्थानिक ग्रामस्थांसह घाट माथ्यावरून आलेल्या भक्तांचाही समावेश होता. दुपारी 12.30 वाजेपर्यंत दर्शन सुरु होते. दिवसभरामध्ये सुमारे पाच हजाराहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक भक्त दाखल झाले होते. सायंकाळी 4:30 वाजता हार फुलांनी सजवलेल्या पालखी मधून ’श्रीं’ ची पालखी परिक्रमा काढण्यात आली. या वेळी गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थांसह भक्त सहभागी झाले होते.
दरम्यान, मालगुंड गणपतीपुळे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कार्तिकी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पाटी, गुरव, होमगार्ड धावडे, सुरज जाधव यांनी गणपतीपुळे परिसर आणि किनारी भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शनानंतर समुद्र स्नानासाठी पर्यटक धाव घेतात. त्यांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून ’जीव रक्षक’ समुद्र किना-यावर नियुक्त केले होते.