गणपतीपुळे मंदिर होणार खुले मात्र वॉटरस्पोर्टसाठी राहणार प्रतिक्षाच

खराब हवामानाचा फटका; आणखी 20 दिवस व्यवसाय बंदच

रत्नागिरी:- घट स्थापनेच्या मुहूर्तावर गणपतीपुळे मंदिरही दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे सात महिन्यानंतर पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे; मात्र खराब हवामानामुळे समुद्र खवळलेला असून बोटी चालवणे अशक्य आहे तसेच कागदोपत्री परवानग्यांसाठीही पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार असल्याने वॉटर स्पोर्टसचा थरार सुरू होण्यासाठी सध्यातरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यात गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, मुरूड, दापोली येथे वॉटर स्पोर्टस् सुरू आहेत. गणपतीपुळे किनारी १७ बोटी असून ७ जेट स्की आहेत. यावर शंभरहून अधिक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोना कालावधीत पर्यटन व्यवसायालाच खिळ बसली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर पर्यटक फिरण्यासाठी किनारी भागांकडे वळू लागले आहेत; मात्र मंदिरे बंद असल्यामुळे पर्यटकांची तेवढी गर्दी नव्हती. त्यामुळे पर्यटन व्यवसायात वृद्धी आलेली नाही. या परिस्थितीत राज्य शासनाने घटस्थापनेला मंदिर उघडण्यास हिरवा कंदिल दिल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानकडूनही मंदिर उघडण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. रविवारपासून मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमावलीनुसार दर्शन व्यवस्था करण्यात येणार असून देवस्थान कमिटीकडून तसे नियोजन केले जात आहे.

गेले काही दिवस वातावरण खराब असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. बंगालच्या उपसागारात गुलाब चक्रीवादळ घोंगावत असल्याने अजूनही वातावरण अस्थिरच आहे. बोटिंग सुरू करण्याच्यादृष्टीने समुद्र स्थिर होण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी येणार्‍या सामान्य पर्यटकांना वॉटर स्पोर्टसचा थरार अनुभव घेता येणार नाही. याबाबतच्या परवानग्या महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून दिल्या जातात. यासाठी बोटिंग करणार्‍यांनी कागदपत्रे जमा करण्यास सुरवात केली असून १५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्षात बोटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.