गणपतीपुळे किनारा अखेर पर्यटकांसाठी झाला खुला 

रत्नागिरी:- जीवरक्षक नसल्यामुळे गणपतीपुळे किनार्‍यावर पर्यटकांना स्थानिक पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता; मात्र मंगळवारी हा किनारा ग्रामपंचायतीकडून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. किनार्‍यावर जाण्यास कोणीच अडकाठी न केल्यामुळे पर्यटकांचा राबताही होता. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकही ग्रामपंचायत नेमणार आहे.

सलग सुट्ट्या आणि कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांचा राबता दोन दिवस वाढलेला होता. अनेक पर्यटक बिनधोकपणे समुद्रस्नानाला उतरत होते. किनार्‍यावर जीवरक्षक नसल्यामुळे स्थानिक पोलिसांकडून त्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीला सुरक्षेविषयक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तोपर्यंत गणपतीपुळे देवस्थानचे दोन रक्षक तिथे नियुक्त केले गेले आणि किनार्‍यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. या निर्णयावरुन पर्यटकच नव्हे तर स्थनिक व्यापारीही नाराज होते. मंगळवारी बिच पर्यटकांसाठी मोकळा करुन देण्यात आला होता. किनार्‍यावर जाण्यासाठी पर्यटकांना कोणीच मज्जाव केला नाही. स्थानिक पोलिसांनीही जीवरक्षकाचा मुद्दा असल्यामुळे अडकाठी केल्याचे स्पष्ट केले आहे. देवस्थान परिसरात लावण्यात आलेली दोरी आणि फलक दोन्ही काढून टाकण्यात आले होते. मंगळवारीही अनेक पर्यटक किनार्‍यावर फिरत होते. काहींनी समुद्र स्नानाचाही आनंद घेतला होता. ती दोरी आणि फलक पर्यटकांकडूनच काढून टाकण्यात आले होते. कोणीच मनाई न केल्यामुळे पर्यटकही किनार्‍यावर फिरत होते. किनारा खुला झाल्यामुळे फेरीवाल्यांना दिलासा मिळाला.