रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारूप आराखड्याची ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांना व सदस्यांना प्रतीक्षा आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप आराखडा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची राजकीय नेत्यांना प्रतीक्षा आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 2 फेब्रुवारीस राज्यातील 25 जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून पाच फेब्रुवारीपर्यंत गट व गणांची पुनर्रचना करून त्याचा कच्चा आराखडा ईमेलद्वारे मागवला होता. त्या नंतर 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात प्रारूप आराखड्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पुनर्रचना केली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून दोष आढळलेल्या गट व गणांची पुनर्रचना करून पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाल्याची चर्चा आहे. यामुळे निवडणूक आयोग लोकांना बघण्यासाठी प्रारूप आराखडा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जाहीर करेल, असे आडाखे बांधले जात आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी प्रत्येक तहसील कार्यालयातून गटरचनेचा प्रारूप आराखडा घेऊन तो एकत्रितपणे राज्याकडे पाठवला आहे. मात्र, प्रत्येक तालुक्याचे गट व गणांच्या पुनर्रचनांचे कच्चे आराखडे सोशल मीडियावर फिरवले जात आहे. या गटांच्या पुनर्रचना खर्या आहेत हे समजून गावोगावी बदललेल्या राजकीय परिस्थितीबाबत खमंग चर्चाना उधाण आले आहे. सोशल मीडियावर फिरणार्या गटांच्या पुनर्रचना खर्या आहेत की खोट्या या बाबत कोणतीही खातरजमा होत नसली तरी त्याचे जिल्ह्यातील राजकारण ढवळून टाकले आहे.
जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्राथमिक आराखड्यानुसार जिल्हा परिषदेचे 7 गट तर पंचायत समितीचे 14 गण वाढणार आहेत. पूर्वी जि.प.चे 55 गट होते. आता ही संख्या 62 वर जाणार आहे. तर पंचायत समितीचे 110 गण होते आता ही संख्या 124 होणार आहे. यामुळे आता उमेदवारी जाहीर करताना राजकीय पक्षांना थोडासा दिलासा मिळाला आहे.