खुनाचा गुन्हा दाखल होणार; संशयित फरारी रडारवर
रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कार्यालयातील कर्मचार्यांचे जेवण बनवण्यासाठी गेलेल्या आणि गंभीर अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान यातील संशयित आरोपीचे लोकेशन काढण्यात जयगड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची पथके पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाली आहेत.
जयगड येथील डेक्कर ओव्हरसिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत जेवण बनवण्याकरिता सडेवाडी येथील दीक्षा किरण मेस्त्री (वय ३२) ही विवाहिता जात होती. गेले अनेक महिने ती या कंपनीच्या कर्मचार्यांचे जेवण बनवत होती. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे दीक्षा ही कपंनीत जेवण बनवण्याकरिता गेेली होती. त्याचवेळी डेक्कन ओव्हरसिज प्रा. लि. कंपनीच्या आवारातील गेस्टहाऊसमधील रूम नं. ४ मध्ये दीक्षा साफसफाई करीत असतानाच संशयिताने कोणत्या तरी तीक्ष्ण हत्याराने तिच्या डोक्यात वार करून जीवघेणा हल्ला केला होता.
या हल्ल्यात दीक्षा ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ज्या रूममध्ये दीक्षा साफसफाईचे काम करत होती त्या रूममध्ये रक्ताचे पाट वाहत होते. गंभीर अवस्थेत दीक्षा रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली होती.
या प्रकारानंतर एका संशयिताने त्याबाबतची माहिती दीक्षाच्या कुटुंबियांना दिली आणि त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद करून परिसरातून पलायन केले. ज्या व्यक्तीने माहिती दिली त्या व्यक्तीने पलायन करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित राहिला होता.
दीक्षा हिला गंभीर अवस्थेत रत्नागिरीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी तिची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी १२.२० वा.च्या सुमारास दीक्षाचा मृत्यू झाला.
दरम्यान, मंगळवारी रात्री उशीरा जयगड पोलिसांनी यातील संशयित मारूती राजाराम मोहिते-पाटील (रा. हातकणंगले, कोल्हापूर) याच्याविरोधात भा.दं.वि.क. ३०७, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र दीक्षाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाल्याने जयगड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
मारूती राजाराम मोहिते-पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दीक्षाला मारण्याचे नेमके कारण काय? कोणता वाद शिगेला गेला? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून जयगडमधून गायब झालेल्या मारूती मोहिते-पाटील याच्या शोधासाठी जयगड पोलिसांची पथके कोल्हापूर येथे रवाना झाली आहेत. रात्री उशीरापर्यंत संशयिताच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे.