रत्नागिरी:- गया (बिहार) येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील सहाव्या राष्ट्रीय खेलो इंडिया खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात रत्नागिरीची दिव्या पाल्ये हिची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा ४ ते १५ मे या कालावधीत होणार आहे.
देशभरामध्ये दर्जेदार खेळाडू घडावेत यासाठी शासनाने खेलो इंडिया स्पर्धाचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये खो-खो या क्रीडाप्रकाराचा समावेश आहे. क्रीडा विभागाकडून होणाऱ्या या स्पर्धांची राज्यस्तरावर निवड चाचणी घेण्यात येते. पुणे बालेवाडी येथील क्रीडांगणावर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून सहभागी झालेल्या दिव्या पालये हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हातखंबा- खेडशीचे ग्रामपंचायत अधिकारी दिपक पाल्ये यांची ती कन्या आहे. ती अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिला राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक पंकज चवंडे, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन मिळते. तिच्या निवडीनंतर अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी यांच्यासह रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक लीना घाडीगावकर, राकेश मालप यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.