खेड:- तालुक्यातील भरणे – गणेशनगर येथील एका महिलेस घरातील जादूटोण्याच्या सहाय्याने गुप्तधन काढून देतो, असे आमिष दाखवून त्याची पूजापाठ करण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तथाकथित तीन भोंदूबाबांना पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, फसवणुकीच्या रकमेतून भोंदूबाबांनी खरेदी केलेली व भाडेतत्त्वावर दिली जाणारी ७ लाख रुपये किमतीची कार पोलिसांनी पाटण- हिरेवाडी येथून जप्त केली आहे. भरणे – गणेशनगर येथील विठाबाई अण्णाप्पा पवार या महिलेस प्रसाद हरीभाऊ जाधव, विवेक यशवंत कदम, ओंकार विकास कदम या तीन भोंदूबाबांनी गुप्तधनाच्या नावाखाली कोट्यवधी रूपये मिळवून देतो, असे आमिष दाखवत मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तब्बल ४० लाख ९० हजार रुपये उकळले होते. बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही गुप्तधन मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी तक्रार नोंदवली होती.
प्रसाद हरिभाऊ जाधव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या भोंदूबाबाने फसवणुकीतील रकमेतून ७ लाख रुपये किमतीची कार खरेदी करत गुरुदत्त ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसायही सुरू केला होता. एमएच १४ केओ ५४२२ या क्रमांकाची ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर व पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत. या प्रकरणी विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. स्मिता कदम यांनी काम पाहिले.