खेड पोलिसांची रेकॉर्डब्रेक कामगिरी; चोरट्याच्या अवघ्या ६ तासात मुसक्या आवळल्या

चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत 

रत्नागिरी:- खेड तालुक्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत जेरबंद केले.अवघ्या सहा तासात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडील चोरीचा सर्व मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. 
 

9 एप्रिल रोजी  दुपारी दोन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान सौ. उजमा नकीब तांबे, (वय २८ वर्षे, व्यवसाय – गृहिणी, रा. तांबे मोहल्ला, खेड) या त्यांचे घरातील सर्व सदस्यांसह नातेवाईकांकडे दावतसाठी गेल्या होत्या. ती संधी साधुन त्यांच्या घराची कडी उघडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला. घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीमधील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून तसेच ऊजमा तांबे यांची जाऊ सौ. खतीजा तांबे यांचे खोलीतील पंलगावरील व ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमधील असा एकूण रु.2 लाख 4 हजार किंमतीचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम वगैरे असा ऐवज अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन नेला. 

याबाबत सौ. उजमा नकीब तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाणे येथे  दि.10 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाची माहीती मिळताच मा.पोलीस अधिक्षक श्री. मोहीतकुमार गर्ग, मा. उपविभागीय पोलीस अधिकरी श्री. शशीकिरण काशीद, पोनि. श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुजित गडदे, पोना. विरेंद्र आंबेडे, पोशि. संकेत गुरव, पोशि. साजिद नदाफ यांच्या तपास पथकाने गुन्हयातील आरोपीबाबत काहीही ठोस मागमूस नसताना, कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हा इसम नामे नदीम अब्दुल्ला तांबे, (वय २९ वर्षे, रा. फ्लॅट नं.१०२, दुसरा माळा, स्टरलिंग अपार्टमेंट,  तांबे मोहल्ला, खेड) याने केल्याचे निष्पन्न करून, त्याला अटक केली. त्याच्या कडून गुन्ह्यातील त्याने चोरलेला रु.२,०४,०००/- रु. किंमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. 

सदर आरोपीत यास रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. सदर आरोपी याने खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारचे आणखी मालमत्तेविषयक गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे का, या अनुषंगाने अधिक तपास सपोनि. सुजित गडदे हे करीत आहेत.