खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

खेड:- तालुक्यातील कोंडीवली येथे शौचालयासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकास शहादत सरदार असे त्याचे नाव असून, ही घटना २३ जून रोजी सायंकाळी घडली. पावसामुळे जीवितहानीची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.

तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तालुक्यातील कोंडीवली येथे या पावसामुळे शौचालयासाठी खोदलेल्या खड्यात पाणी साठले होते. या पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये पडून वकास या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

बराचवेळ तो दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला असता तो खड्ड्यात पडल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर सरदार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.