रत्नागिरी:- शहरातील खड्ड्यांवरून रत्नागिरी नगर परिषद सोशल मीडियावर ट्रोल होत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील शहरातील खड्ड्यांवरुन नगरपरिषदेला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे ‘खड्डे चुकवा, बक्षिस मिळवा’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले असून त्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांची खोदाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने ही खोदाई झाली. त्यामुळे मोठे चर रस्त्यांवर पडले. अर्धा रस्ताच पाईपलाईनखाली गेल्याने शहरातील रस्त्यांची रुंदीदेखील कमी झाली आहे. काही ठिकाणी तर भर पावसात रस्ते खोदाई झाली आणि त्यानंतर शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले.
शहरातील रामनाका, बसस्थानक परिसर, जेलरोड, गाडीतळ ते परटवणे, मांडवी, कॉंग्रेस भुवन ते खालची आळी आदी रस्ते तर नामशेष झाले आहेत. या परिसरात खड्ड्यांचेच साम्राज्य असल्याने येथे रस्ते होते का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
२ दिवसांपूर्वीच भाजपा युवा मोर्चाने खड्डे बुजवा मोहिम हाती घेतली. स्वखर्चातून डबर आणून रस्त्यातील खड्डे व चर भरण्याचा प्रयत्न केला. मात्र भलेलमोठे खड्डे ठिकठिकाणी असल्याने डबर टाकायचे तरी किती ठिकाणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील नगरपरिषदेला लक्ष्य केले आहे. एकीकडे सोशल मीडियावर नगर परिषद ट्रोल होत असताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनेदेखील नगरपरिषदेला ट्रोल केेले आहे. नगर परिषदेला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अनोेख्या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ‘खड्डे चुकवा, बक्षिस मिळवा’ अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. या स्पर्धेचे ठिकाण रामनाका ते राधाकृष्ण नाका, गोखले नाका ते गाडीतळ, जेलरोड ते डीएसपी बंगला, फाटक हायस्कूल ते परटवणे, मांडवी बीच ते भुतेनाका व भुतेनाका ते कॉंग्रेेस भुवन, असे असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.