कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’

रत्नागिरी:- कुस्तीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा युवा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या गुण फरकाने विशाल बनकरला मात देऊन महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी ठरला आहे.

विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. 20 वर्षीय जागतिक कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या पृथ्वीराज पाटीलने 21 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी विजेतेपद पटकावले आहे.

आज महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती मॅटवर रंगली. या कुस्तीत खुल्या म्हणजे 86 ते 125 किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेल्या दोन पैलवानांमध्ये महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी अंतिम लढत होते.

विशेष म्हणजे दोघेही पैलवान कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर मुळ सोलापूरचा असलेला विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर पृथ्वीराजने विशालला 5-4 ने मात दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचा युवा पैलवान पृथ्वीराज पाटील याच्या उल्लेखनीय यशासाठी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.