कोल्हापुरात पूर! कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद

कोल्हापूर:- राज्यभरात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापुरलाही या पावसाचा फटका बसला आहे. कोल्हापूरमधील पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कोल्हापूरमध्येही पावसाची संततधार कायम आहे.

पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट

दरम्यान, पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट इतकी आहे. मात्र सध्या पाणी ४० फुटांवरून वाहत आहे. शिवाय, राधानगरी धरण 100 टक्के भरले असल्याने 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भोगावती नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. परिणामी नादीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

गगनबावडा घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद
लोंगे-किरवे इथं नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग बंद आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग बंद आहे शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 राज्यमार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद आहेत.