रत्नागिरी:- तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या त्या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून अहवाल येईपर्यंत प्रेत शवागृहात पॅक करून ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. त्या महिलेवर अंत्यसंस्कार करायचे कोठे? यावरून मोठा वाद रंगला होता.अखेरीस त्या महिलेचे प्रेत चिपळूण येथे सासरी पाठविण्यात आले.दरम्यान हि महिला रत्नागिरी शांतीनगर परिसरात अनेकांच्या संपर्कात आली होती. हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या १४ जणांना क्वारंटाईन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी मुंबई येथून आलेली महिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचबरोबर ती रेडझोन मधून आल्याने तिची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. मात्र त्या टेस्टचा अहवाल येण्यापुर्वीच त्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. त्या मृत महिलेचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझीटीव्ह आला आणि एकच खळबळ उडाली.
मूळच्या ओंबळी-नारद खेरकी चिपळूण येथील असलेली ती महिला नोव्हेबर २०१९ मध्ये मुंबई जोगेश्वरी येथे मुलीकडे रहायला गेल्या होत्या. अशी माहिती पुढे आली असून काही दिवसांपूर्वी त्या मुंबई येथून गावी परतल्या होत्या. त्या मुंबईतून कशा आल्या याबात अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. त्याबाबत प्रशासन माहिती घेत असून ज्या वाहनातून त्या चिपळूण येथे मूळ गावी आल्या त्या वाहन चालकाचा आता शोध सुरु झाला आहे.
मुंबईतून गावी मूळच्या ओंबळी-नारद खेरकी चिपळूण येथे ती महिला १४ मे २०२० रोजी दाखल झाली. मात्र मुबई-ते चिपळूण हा प्रवास तिने नेमका कोणत्या वाहनातून केला? त्यांना गावी कोणी आणून सोडले याबात प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आजारी असलेल्या महिलेला मुंबइत दाखल न करता गावी आणण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
त्या महिलेचे नातेवाई हे शांतीनगर रसाळवाडी येथे असून ती महिला एका खासगी गाडीतून १७ मे रोजी सायंकाळी शांतीनगर रसाळवाडी येथे दाखल झाली. त्याठिकाणी त्या महिलेने एक रात्री मुक्काम केला. व त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या उपचारासाठी रत्नागिरीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार दिल्याने ती महिला जिल्हा रुग्णालयात गेली.
त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी तिची तपासणी करून तिच्या प्रवासाची माहिती घेण्यात आली. मुंबईतून ती महिला आल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेणात आले. तिला श्वास घ्याला त्रास देखील होत होता.त्यामुळे तिची टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार तिची कोरोनाची टेस्ट करण्यात आली.नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठीण्यात आले होते.
तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मृत्यू झाला. मात्र तिचे कोरोनाचे अहवाल प्रलंबित होता. मृत महिलेचे करायायचे काय? असा प्रश्न असतानाचा अहवाल येईपर्यंत मृतदेह पॅक करून शवागृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार प्रेत सर्व खबरदारी घेऊन पॅक करण्यात आले होते. मात्र याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती कि नाही याबात कोणतीच माहिती मिळू शकली नाही.
गुरुवारी रात्री नव्या ११ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात धावाधाव सुरु झाली. त्यात त्या मृत महिलेचा अहवाल देखील पॉझीटीव्ह आला होता. त्या महिलेवर अंत्यसंस्कार करायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आणि नव्या वादाला तोंड फुटले.तीन दिवसांपूर्वी मयत झालेल्या त्या महिलेचा मृतदेह का शवागृहात ठेवला गेला असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.
कोरोना बाधित मृत महिलेवर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न असतानाच रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हि माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि विरोधाचे सूर लागलीच उमटू लागले. रत्नागिरी शहरात त्या कोरोना बाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नगर परिषदेने विरोध केला. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी कोणत्याही परिस्थितीत शहरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. जनतेचा देखील विरोध असल्याचे सांगून आपली हरकत नोंदवली.
ती महिला १७ मे रोजी सायंकाळी शांतीनगर रसाळवाडी येथे आली होती. त्याठिकाणी तिने एक रात्री मुक्काम केला होता. त्यामुळे ती अनेकांच्या संपर्कात आल्याने हा परिसर सील करण्याचा निर्णय गुरुवारी रात्री घेण्यात आला. त्यानुसार सारी यंत्रणा कामाला लागली होती.शुक्रवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची टीम त्या परिसरात दाखल झाली आणि ती महिला राहिली होती त्या घराभोवतालचा परिसर सील करण्यात आला.
शांतीनगर रसाळवाडी येथे आलेली ती महिला अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार यादी बनविण्याचे काम गुरुवारी रात्रीपासून सुरु झाले होते. रसाळवाडी येथील तब्बल १४ व्यक्ती त्या महिलेच्या संपर्कात आल्या होत्या. हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या त्या १४ जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले असून सर्वाना रुग्णालयात क्वांरंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांची कोरोनाची टेस्ट केली जाणार असून त्यांचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविले जाणार आहेत.
चिपळूण येथील गावी आलेली ती महिला १७ मे रोजी एका कारमधून रत्नागिरीत आली होती. तिला रत्नागिरीत घेऊन येणारा कार चालक कोण? याबाबत शोध घेण्याचे काम सुरु झाले असून त्या कार चालकाला ताब्यात घेऊन त्याची देखील तपासणी केली जाणार आहे.तसेच मुंबई येथून ती महिला गावी कोणत्या वाहनाने आली याची माहिती घेण्याचे काम देखील सुरू आहे.