कोरोना काळातील विकासकामांना रनप देणार मुदतवाढ

रत्नागिरी:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या नऊ महिन्यात रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांवर परिणाम झाला होता. लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग मिळेनासा झाले होते. आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. अशा कामांच्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई न करता रत्नागिरी नगर परिषद त्या कामांना मुदत वाढ देणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाले. 24 मार्चपासून लॉकडाऊनचे नियम सुरू झाले. तत्पूर्वी घेतलेली अनेक विकासकामे कामगारवर्ग नसल्याने रखडून पडली. शासन परिपत्रकानुसार अनेक कामांना मुदत निश्चित होती. परंतु, प्रत्यक्षात पहिले चार ते पाच महिने असेच कोणतेही प्रत्यक्ष काम न होता निघून गेले. लॉकडाऊनचे नियम शिथिल होत गेले तशी थांबलेली कामे सुरू होऊ लागली. रनपच्या उत्पन्नात नियमित भर पडत नव्हती. त्यामुळे ठेकेदारांकडून होणार्‍या कामानुसार मोजमाप पुस्तिकेत नोंदी होत घेण्यासाठी त्यानुसार बिलांच्या रकमा मिळत नव्हत्या. आजपर्यंत बहुतांश ठेकेदारांचे लाखो रूपये मिळालेले नाहीत. परिणामी पुढील कामेही संथपणे सुरू आहेत.

लॉकडाऊन पूर्वी घेतलेली कामे मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित होते. कामांच्या करारपत्रांमध्ये विकासकामे कधी पूर्ण करायची याची मुदत शासन परिपत्रकानुसार नोंदवली गेली. लॉकडाऊनमुळे अनेक महिने वाया गेल्याने ठेकेदाराने मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या अटीतून दिलासा देण्याची विनंती केली. बहुतांशी विकासकामे 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची मुदत होती. ही कामे अजून प्रगतीपथावर असल्याने 15 सप्टेंबर 2020 पर्यंत दंडमाफीसह कामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय घेतला असून, तसा बदल ठेकेदारांनी केलेल्या कामांच्या संदर्भातील करारामध्ये नमूद करून घेण्यात येणार आहे.