कोट्यावधींचा खर्च तरीही जिल्ह्यातील दोन टक्केच क्षेत्र सिंचनाखाली

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाटबंधारे विभागाचे ६१ प्रकल्प असून त्यात ४७७ दलघनमीटर पाणी साठा होतो. आतापर्यंत या धरणांवर तीन हजार कोटींचा खर्च झाला असून या पाण्यापैकी अवघे पाच टक्के म्हणजेच २५ दलघनमीटर पाणी सिंचनासाठी वापरले जाते. एकुण क्षेत्राच्या दोन टक्केच क्षेत्र म्हणजे २० हजार हेक्टर जमिनीचा सिंचनासाठी वापर होत आहे अशी माहिती जल परिषदेच्या निमित्ताने पुढे आली. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणले तर जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो.

जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होते; मात्र ते पाणी वाया जाते. त्याचा उपयोग सिचंनासाठी होणे आवश्यक आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या सिंचन परिषदेमधून जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांचा म्हणावा तसा उपयोग होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पाटबंधारे महामंडळाच्या अभियंता वैशाली नारकर यांनी केलेल्या सिंचनाविषयीच्या सादरीकरणात यावर प्रकाश टाकला.

जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र ८ लाख १९ हजार ५५६ हेक्टर असून साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. पाटबंधारे विभागाच्या ६१ प्रकल्पांमध्ये ४२७ दलघनमीटर पाणी साठवले जाते. सध्या सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांमुळे आणखी ११० दलघनमीटर पाणी साठ्यात वाढ होईल. आतापर्यंत धरण प्रकल्पांवर ३ हजार कोटी रुपये खर्च झाले असून १५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जलसंपदा विभागाने सिंचनासाठी एवढा मोठा खर्च होत असून त्यामधून पाहिजे तसे सिंचन झालेले नाही. सिंचनक्षेत्रासाठी उपलब्ध ४७७ दलघनमीटरपैकी पाच टक्के म्हणजेच २५ दलघनमीटर पाणी सिंचनासाठी वापरले जाते. पाटबंधारेच्या धरण क्षेत्रातील पाण्याचा वापर करुन २० हजार हेक्टर सिंचनाखाली आले आहे. भविष्यात त्यात १४ हजार हेक्टरची भर पडणार आहे.