कोकणातील बंडखोरांना शिवसैनिकच घरी पाठवतील: अनंत गीते

रत्नागिरी:- ‘मातोश्री’ ही राजकारणातील प्रत्येक शिवसैनिकाची आई आहे. आज आपली आई अडचणीत असताना सर्व शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. जे कृतघ्न होते ते तोंड काळं करून निघून गेले. आता या गद्दारांना माफी नाही. शिवसैनिकच त्यांना टकमक टोक दाखविल्याशिवाय शांत बसणार नाहीत. गद्दारांमध्ये आपला पण एक गद्दार निघाला. कोकणातील पाचही बंडखोरांना घरी बसविल्याशिवाय शिवसैनिकांनी शांत बसायचे नाही. आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. एका ‘उदय’चा अस्त करून बनेंचा उदय करायाचा आहे. असे सांगून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने हेच भविष्यातील उमेदवार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री श्री.अनंत गीते यांनी जाहीर केले. त्यावेळी वि.दा.सावरकर नाट्यगृहात बने हितचिंतक, शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात श्री.गीते यांच्या घोषणेचे स्वागत केले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.उदय बने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गीते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, जि.प.चे माजी उपाध्यक्ष, कडवट शिवसैनिक यशवंत उर्फ दादा कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक सौ.साक्षी रावणंग, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वयाच्या 61व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल श्री.गीते यांनी श्री.उदय बने यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्या राजकारणातील प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले. त्यानंतर शिवसेनेत राहून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या शिंदे गटाचा श्री.गीते यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आज समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री.उदय बने यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. असा हा कडवट शिवसैनिक एका बाजुला तर कृतघ्न होऊन तोंड काळे करून गेलेलेही या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने पाहिले आहे. ‘ तो मी नव्हेच’ या नाटकात एकच लखोबा लोखंडे होता. परंतु शिंदेंच्या  गटात अनेक लखोबा आहेत. त्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघातील एक लखोबा निघाला हे दुर्दैवी आहे. परंतु शिवसेनेने या मतदारसंघासाठी आजच दुसरा ‘उदय’ दिल्याचे श्री.गीते यांनी जाहीर केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. खाली खेचणारेच आम्ही आजही शिवसैनिक आहोत असे सांगत आहेत. पक्षप्रमुखाला खाली खेचणारा शिवसैनिक होऊ शकतो का? असा प्रश्न श्री.गीते यांनी उपस्थितांना विचारताच सभागृहातून ‘नाही’ म्हणत प्रतिसाद मिळाला.

ज्यांनी गद्दारी केली, स्वतःची कातडी वाचविण्यासाठी भाजपला जाऊन मिळाले ते, आम्ही परत शिवसेनेत येऊ असे सांगत आहेत. त्यांचे आता वेगळ्या स्टाईलनेच स्वागत केले जाईल. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांचा कडेलोट झाला असता. परंतु शिवसैनिक, मतदारच यांना टकमक टोक दाखवतील असा इशारा श्री.गीते यांनी दिला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडताना डोळ्यातून अश्रू काढले. आज त्याच अश्रुचा महापूर येऊन गद्दार त्यामध्ये वाहून जातील. असे सांगत भविष्यात न्यायालयीन लढाईही शिवसेनाच जिंकेल. न्यायालय शिवसेनेला नक्की न्याय देईल त्यावेळी सर्व गद्दार अपात्र होतील. त्यानंतर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावली जाईल तर गुजरात राज्याच्या निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातही सार्वत्रिक निवडणुका होतील असे भाकित श्री.गीते यांनी वर्तवले आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे पुढचे उमेदवार उदय बनेच असतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची अधिकृत घोषणा करतील. परंतु शिवसैनिकांनी कामाला लागावे. रत्नागिरी, रायगड दोन्हीही जिल्ह्यांची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे पक्षप्रमुखांना सांगितले आहे. रायगडमधील तीन, रत्नागिरीतील दोन गद्दारांना धूळ चारण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन श्री.गीते यांनी केले. येणाऱ्या कालावधीत रत्नागिरी, रायगड दोन्हीही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करून संघटन अधिक मजबूत केले जाणार असल्याचे श्री.गीते यांनी सांगितले.

कृतज्ञता सोहळ्यात उदय बनेंच्या मातोश्री श्रीमती प्रमिला विनायक बने यांचे साठ दिव्यांनी ओवाळून औंक्षण करण्यात आले. त्यानंतर श्री.उदय बने यांनी व्यासपीठावरून लोटांगण घालत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी आपण अनेक अपघात, संकटातून सहीसलामत बाहेर पडत आजही भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक, मतदारांनी, जुन्या सहकारी मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळेच आपण खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या आशिर्वादामुळेच आपल्याला लढण्याचे बळ मिळाले असल्याचे श्री.बने यांनी सांगितले.