कोकणवासियांच्या खिशाला कात्री, राजापुरातील हातिवले टोलनाका सुरु

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण मुंबई – गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बोर्डरवरील हातिवले हा टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू होणार असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. हातिवले टोलनाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. पण त्यानंतर देखील आता या ठिकाणी टोलवसुली होणार आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या टोलनाक्याला विरोध होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान 22 डिसेंबरला राजापूरच्या हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा सर्वपक्षीय नेते थेट टोलनाक्यावर धडकले. यावेळी त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोवर टोलवसुली करायला देणार नाही असा इशारा दिला होता. निलेश राणे यांनी थेट केंद्रीय मंत्री, राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना फोन करून टोल वसुलीला आमचा नेमका विरोध का? याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने निलेश राणे यांनी थेट केबिनला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आला होता. 

आता पुन्हा एकदा हातिवले टोलनाका सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा  सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिकांचा विरोध पाहायला मिळणार की टोलवसुली सुरळीत सुरु होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.