कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक उद्यापासून लागू

रत्नागिरी:- कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मुंबई ते कोकण दरम्यानची मेल-एक्सप्रेसची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू रहावी यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे ६७३ जवान गस्त घालणार आहेत. पावसाळी वेळापत्रक येत्या १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहाणार आहे

अतिवृष्टी सुरू असताना गाड्यांचा वेग ताशी ४० किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा स्थानकांवर ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) आणि वेर्णा येथे एआरटी (अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन) देखील सज्ज ठेवली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांना तातडीच्या वेळी स्थानके आणि कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल फोन दिले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड्स ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट दिले आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स सरासरी एक किमी अंतरावर आहे. जे पेट्रोलमन, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्यास मदत करतात. आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्ही (अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन) मध्ये सॅटेलाईट फोन संपर्क प्रदान केला आहे. सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल एलईडीने बदले आहेत.

माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ स्थानकात पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. पुराची माहिती देणारी यंत्रणा तीन ठिकाणी आहे. काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकार्‍यांना सतर्क करेल.