रत्नागिरी:- या वर्षात कोकण रेल्वेने देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. गेल्या नऊ महिन्यात राष्ट्रीय संकटात श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोकण रेल्वेने या वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतानाही यशाची नवी शिखर हि गाठली आहेत.
मार्च मध्ये देशावर कोरोनाचे संकट आले आणि लॉक डाउनच्या काळात लाखो श्रमिक आपआपल्या घरापासून दूर देशाच्या विविध राज्यात अडकले. कोकण रेल्वेने या काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावली . सोशल डिस्टंसिंग चे सारे नियम पाळत कोकण रेल्वेने या काळात तब्बल १ लाख १० हजार ६२८ श्रमिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली . सर्व ठिकाणच्या जिल्हाप्रशासन आणि पोलीस यंत्रणाबरोबर सतत समन्वय ठेवत कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचारी वर्गाने कोव्हीड योद्धा म्हणून काम करत या श्रमिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले .लॉक डाऊन च्या काळात शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती होती. कोकण रेल्वेने मालगाडी वाहतुकीच्या माध्यमातून लोकांची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवली. ८० श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या घरी पोहोचवणाऱ्या कोकण रेल्वेने २४ स्पेशल पार्सल ट्रेन चालवत या अडचणीच्या काळात जीवनावश्यक वस्तू विविध शहरात पोहोचवत सरकारला मोलाची साथ दिली .
सरत्या वर्षात अनेक अडचणीमुळे काम ठप्प झाली असताना कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरण च्या कामाचा वेग मंदावू दिला नाही . विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरण या दोन्ही कामामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे . प्रदूषण मुक्त इको फ्रेंडली प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. हि काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व त्या खबरदारी घेत वर्षभरात कोकण रेल्वेने काम केलंय . यामुळेच रोहा ते रत्नागिरी या मार्गाचं विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्णत्वा कडे जातंय. तर रोहा ते वीर दरम्यान मार्ग दुपदरीकरणाचे चे काम वेगाने सुरु आहे.ऑगस्ट 2017 मध्ये रोहा ते ठोकूर या 740 किलोमीटर च्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू झाले होते.यातील जवळजवळ 70 टक्यातून अधिक काम पूर्ण झाले आहे.विद्युतीकरणाचे हे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.कोकण रेल्वेने आजवर विद्युतीकरणाच्या या कामावर 780 कोटी रुपये खर्च केले आहेत.कोकण रेल्वेचा वर्षाला इंधनावर होणारा खर्च 260 ते 300कोटींच्या घरात आहे.विद्युतीकरणानंतर इंधन खर्चात 100 कोटी रुपयांपर्यंत बचत होणे अपेक्षित आहे.
विद्युतीकरणाच्या या कामावर 1140 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.नव्या वर्षांत हि कामे लवकरात लवकर पूर्ण करून अधिक आरामदायी प्रवासासाठी कोकण रेल्वेची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे . कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आधी जलद गतीने व्हावा यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर १० नवी स्थानक आणि ८ लूप लाईन्स करणायचे काम आता वेगाने सुरु आहे . यामुळे येणाऱ्या वर्षात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे .
भारतीय रेल्वेमध्ये आपल्या विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या कोकण रेल्वेने सरत्या वर्षात हि कौतुकास्पद कामगिरी केलेय. यावर्षी कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेपाळ सरकारला दोन खास डिझाईन केलेले डेमु प्रदान करण्यात आले . कोकण रेल्वे काश्मीर मध्ये आव्हानात्मक काम करते आहे. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंक च्या या महत्वपूर्ण कामात टी -२ हा महत्वाचा बोगदा पूर्ण करण्यात ऑगस्ट २०२० मध्ये कोकण रेल्वेला यश मिळाले . तर भारत आणि नेपाळ याना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाच्या स्थल निरीक्षणांची जवाबदारी कोकण रेल्वेकडे विश्वासाने सोपवण्यात आली . गेल्या वर्षांत संकटाच्या काळात कोकण रेल्वेने कोव्हीड योद्धयांची भूमिका बजावतानाचा राष्ट्र उभारणीच्या कामात प्रतिकूल परिस्थितीत हि महत्वाची भूमिका बजावली आहे. कोकण रेल्वेची टीम अहोरात्र घेत असलेल्या मेहनतीमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास येणाऱ्या वर्षात अधिक वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे .