रत्नागिरी:- बीएसएनएलचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणाच्या दोन बँक खात्यातून सुमारे 69 हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने लांबवले.याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना शनिवार 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली.
याबाबत मयुरेश अशोक शेवडे (28,रा.स्वरुपानंद कॉम्प्लेक्स,रत्नागिरी) याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी दुपारी मयुरेशच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरुन बीएसएनएलचे केवायसी अपडेट करण्याबाबत लिंक पाठवून अज्ञाताने त्याच्या जनता सहकारी बँकेच्या खात्यातून 45 हजार ऑनलाईन काढले.त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातूनही 24 हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आल्याचा मेसेज मयुरेशला आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.