कुवारबाव येथे ट्रेलर घसरून अपघात

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथे रत्नागिरी-नागूपर महामार्गावर साईडपट्टीवरुन चालकाच्या हलगर्जीपणामुळे सोमवार 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वा. सुमारास ट्रेलर घसरुन अपघात झाला.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्गाच्या साईडपट्टीवर विनापरवाना छोटे व्यावसायिक असतात. त्या ठिकाणी खरेदीसाठी होणारी गर्दी पाहून मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित वाहतुक पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायतीने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एरवी या रस्त्यावर खरेदीदारांची मोठी गर्दी असते पण सोमवारी दुपारी सुदैवाने या ठिकाणी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. कुवारबाव येथे या महामार्गावर दोन्ही बाजुने तीव्र उताराचा भाग आहे. अशा मार्गावर साईटपट्टीवर सोमवारी दुपारी मोठा ट्रेलर घसरुन हा अपघात घडला होता. दरम्यान,या बाबत कुवारबाव व्यापारी संघाने संबंधित शासकिय यंत्रणेला या अनधिकृत व्यापार्‍यांना हटवून त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तरीही याकडे शासकिय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.