रत्नागिरी:- बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता अजूनही पक्षासोबत आहे. कुणीही खचून जायची आवश्यकता नाही, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एवढे खराब दिवस आलेले नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि पक्षाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस दाखवूया, असे आवाहन दक्षिण रत्नागिरीचे प्रभारी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले.
रत्नागिरी येथे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, रवींद्र डोळस, जिल्हा संघटक वेदा फडके, महिला लोकसभा संपर्क संघटक नेहा माने, उपजिल्हा संघटक धनश्री शिंदे, उल्का विश्वासराव, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, मंगेश शिंदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख किरण तोडणकर, माजी जि.प. सदस्य संतोष थेराडे यांच्यासह राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूणमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीच्या सुरुवातीला दत्ता कदम यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी काही पदाधिकार्यांनी आपले अनुभव कथन केले. पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना तत्काळ कशी पदे दिली जातात. अनेक वर्ष संघटनेत कार्यरत असणारे दावेदार असतानाही आणि चार तालुक्यांचा पाठिंबा असतानाही युवासेनेची पदे नव्या लोकांना दिली गेली. मात्र, ज्यांनी पदे घेतली तेही पक्ष सोडून गेले आणि ज्यांनी ही पदे दिली तेही पक्ष सोडून गेले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली मर्जी राखण्यासाठी संघटनेला वेठीस धरु नये, अशा तीव्र भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे, अशी मतेही पदाधिकारी यांनी या बैठकीत व्यक्त केली.
रिक्त पदांचा आराखडा वरिष्ठांना पाठवणार
यापुढे प्रत्येक तालुक्यात संपर्क सभा आयोजित केल्या जाणार असल्याचे प्रभारी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रिक्त पदांचा आराखडा तयार करुन तो वरिष्ठांना पाठविला जाणार असल्याचेही ते म्हणाले.