काजू बागायतदारांना मिळणार नुकसान भरपाई

रत्नागिरी:- राज्यातील काजू दर कमी झ्ााल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पणनमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.

काजू प्रक्रिया उद्योगाबाबत, काजू बियाणे अनुदान विषयी विधान भवनात आयोजित बैठकीत ना.सत्तार बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, निलेश राणे, योगेश कदम, निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार आदींची उपस्थिती होती.
राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातील, कोकणाशी संबंधित भागात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु काजू बीला हमीभाव नसल्याने, काजूच्या दरामध्ये दरवर्षी अस्थिरता असल्याने व्यापारी कमी दराने काजू खरेदी करतात. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

याकरिता काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या सूचना मागविण्यात येणार आहेत. तसेच तीन वर्षाचा काजू उत्पादन, उत्पादन खर्च यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना काजू उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यासाठी किती निधीची तरतूद करावी लागेल याचाही अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे ना. सत्तार यांनी यावेळी सांगितले.