कळझोंडीतील पूल उभारण्यासाठी हवा 50 लाखांचा निधी

रत्नागिरी:- अतिवृष्टीमुळे कळझोंडी गानसुरेवाडी येथील पुलाचा भाग वाहून गेला आहे. तिथे नवीन पूल उभारणे आवश्यक असून त्यासाठी 50 लाख रुपये निधीची गरज आहे. हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत कळझोंडी गणेशवाडी ते लोहारवाडी रस्ता आणि त्यावरील गानसुरेवाडी जवळील पुलाचे अँबेटमेंट वाहून गेले. पुलाचे एक अ‍ॅबॅटमेंट वाहून गेल्यामुळे पुलाचा स्लॅबही पडण्याच्या स्थितीत आहे. त्या पूलावर भलामोठा खड्डा पडला आहे. हा पूल बराच जुना असून आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. या पुलाचे जुने बांधकाम पाडून त्याठिकाणी नविन पुल बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुलाच्या दोन्ही बाजूकडील नदी पात्राची धुप झालेली असल्यामुळे बाजूच्या घरालाही धोका निर्माण झाला आहे. अ‍ॅबटमेंट वाहून गेले, तेव्हा जवळील स्लूबच्या घरालाही तडे गेले होते. डोंगरातून येणारे पाणी वेगोन याच वहाळातून पुढे जाते. त्यामुळे किनारी भागाची धूप झालेली होती. हा संरक्षति करण्यासाठी आरसीसी संरक्षक भिंत बांधणे अत्यंत गरजेचे आहे. पूल आणि भिंतीसाठी सुमारे 50 लाखाचा निधी आवश्यक आहे. पूल बांधण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकामकडे पाठविण्यात आला आहे. या कामाचा पाठपुरावा करताना मागील सर्वसाधारण सभेमध्ये समाजकल्याण सभापती आणि वाटद जिल्हा परिषद सदस्या सौ. जाधव यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी उत्तर दिले.