खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी-आपेडे फाटा येथे एका हॉटेलजवळील बांधकामाठिकाणी काम करत असताना दहशतवादविरोधी पथकाने जेरबंद केलेला अकबर अबू शेख (६५) या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणाऱ्या व्यक्तीचा येथील पोलिसांकडून शोध जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटापासून चिपळूणनंतर येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कळंबणी आपेडे फाटा येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दहशतवादविरोधी शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश गुरव, आशिष शेलार, योगेश तेंडुलकर, पोलीस नाईक रत्नकांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन राठोड यांच्या पथकाने बांग्लादेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या. त्याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येथील पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता कोरोना महामारीपासून येथे वास्तव्यास असल्याची कबुली दिली. सुरूवातीला चिपळुणात आश्रय देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.