ओणी बाजारपेठेतील दोन ज्वेलर्सची दुकाने फोडून दागिने लंपास

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी बाजारपेठेतील ज्वेलर्सची दोन दुकाने फोडून अज्ञात चोराट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत वसलेल्या ओणी बाजारपेठेत खरवते येथील सुर्यकांत सागवेकर तसेच चुनाकोळवण येथील रविंद्र देवरूखकर यांची ज्वेलर्सची दुकाने आहेत. सागवेकर यांचे दुकान मुख्य बाजारपेठेत तर देवरूखकर यांचे दुकान ओणी-कळसवली तिठयालगत आहे. गुरूवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सागवेकर व देवरूखकर हे दुकान बंद करून आपापल्या घरी गेले. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयानी दुकानातील किंमती वस्तू चोरून नेल्याचे सागवेकर व देवरूखकर यांच्या निदर्शनास आले.
याबाबत राजापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.