रत्नागिरी:- श्रावण महिन्यात भाज्यासह जीवनावश्यक वस्तूचे वाढलेले दर गणेशात्सव तोंडावर असतानाच आणखीन कडाडले आहेत. कांद्ये- बटाट्यांनी पन्नाशी गाठली असताना लसूणही दरात उग्र झाली आहे. कोथिंबीरची जुडी 50 रुपयांना मिळत असून, दरवाढीमुळे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडत आहे.
श्रावणात भाज्या महागल्या होत्या. त्याचबरोबर कादे बटाटाच्या दरांनीही उचल घेतली होती. टोमॅटो दरात घसरण झाली असली तरी आता ते 30 रुपयांवर स्थिरावले आहेत. बटाटा 100 रुपयांना अडीच किलो तर कांदे शंभर रुपयांना दोन किलोच मिळत आहेत. वांगी 50 ते 60, भेंडी 80, सिमला मिरची 75 रुपये, गाजर 70 रुपये काकडी 60 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. गवार, घेवडा, फरसबी, शेवगा शेंगांनी शंभरी ओलांडली आहे. पालेभाज्या जुडीसुद्धा 20 ते 25 रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे. बाजारात मटारचे दर सर्वोच्च असून 200 रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.
भाज्यांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकलेले आहेत. डाळीच्यादरांबरोबरच कडधान्यांचे दरही वधारले आहेत. गृहीणींना या दरवाढीचा फटका बसत आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. सध्या 50 रुपये किलो दराने विक्री सुरु असून, पाऊस लांबल्यास कांद्याचे दर वधारण्याची शक्यता आहे.