एसटीचे ९९ कर्मचारी कामावर हजर

नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच; आझाद मैदानावरही रत्नागिरीचे कर्मचारी

रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांचे आज नवव्या दिवशीही काम बंद आंदोलन चालू राहिले. मंगळवारी दुपारनंतर रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडला तरीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालूच ठेवले. दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर रत्नागिरीतील सुमारे १५ ते २० कर्मचारी दररोज सहभागी होऊन परत येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ९९ कर्मचारी हजर झाले असून राजापूर आगाराच्या ८ फेऱ्या सुटल्या. अन्य आगारातून एकही फेरी सोडण्यात आलेली नाही.

आझाद मैदानावर काम बंद आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याकरिता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचेही पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कर्मचारीही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे दररोज सहभागी होत आहेत. जिल्ह्यात एकूण ४२७१ कर्मचारी आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४८ प्रशासकीय कर्मचारी हजर झाले. तसेच कार्यशाळा ४३, चालक ४, वाहक ४ असे एकूण ९९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनात उत्साह भरपूर आहे. त्यामुळे दुपारनंतर पाऊस पडूनही कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. आतापर्यंत एसटीच्या २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रशासनाने अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांचे निलंबन केलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.