एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; वेतनासाठी १७ कोटी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील साडेचार हजार एसटी कर्मचाऱ्यांना गणपत्तीबाप्पा पावला आहे. गेली २ महिने पगाराविनाअसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १७ कोटी रुपये रत्नागिरी एसटी विभागाला प्राप्त होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ग्रामीण भागात १०० टक्के एसटी वाहतूक सुरू केली आहे. ८० टक्के शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण साडेचार हजार फेऱ्यांपैकी ३ हजार ७०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु अजुनही अपेक्षित भारमान मिळत नाही.

एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात आहे. फेऱ्या बंद असल्याने आणि अनलॉकनंतर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने एसटीचा आर्थिक पाय आणखी खोलात गेला आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला आहे. पगार, डिझेल, सुट्टे पार्ट आदीसाठी एसटीकडे पैसे नसल्याने एसटीची परिस्थिती फार वाईट आहे. पगाराविना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आल्याने एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने शासनाला जाग आली. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य सुविधांसाठी ५०० कोटी रुपये शासनाने जाहीर केले. रत्नागिरी एसटी विभागासाठी त्यापैकी साडेचार हजार कर्मचाऱ्यांसाठी १७ कोटी रुपये मिळणार आहेत. रत्नागिरी विभागातील हे साडेचार हजार कर्मचारी गेली दोन महिने पगाराविना आहेत. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. मात्र शासनाने दिलेल्या ५०० कोटीमुळे त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची गैरसोय टाळण्यासाठी १०० टक्के एसटी वाहतूक सुरू करण्याचे आदेश परिवहन मंत्री आणि पालकमंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात १०० टक्के एसटी वाहतूक सुरू केली आहे. ८० टक्के शहर बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. २२ गाड्यांमार्फत ४ हजार ७०० किमीच्या फेऱ्या सुरू आहेत. एकूण साडेचार हजार फेऱ्यांपैकी ३ हजार ७०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु अजुनही अपेक्षित भारमान नसल्याने एसटीचा हिरमोड झाला आहे. गणेशोत्सवामध्ये भारमान वाढण्याची एसटीला अपेक्षा आहे.