एमआयडीसीच्या धरणात 6 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

रत्नागिरी:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रासह 9 ग्रामपंचायती आणि रत्नागिरी नगर परिषदेसह 250 खासगी ग्राहकांना 6 जून पर्यंत पाण्याची चिंता नाही. एमआयडीसीच्या हरचिरी आणि निवसर धरणात 6 जूनपर्यंत पाणी पुरेल इतका साठा आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 5 धरणे आहेत. त्यातील असुर्डे धरणाची क्षमता 0.362 दलघमी, आंजणारी धरणाची क्षमता 0.545 दलघमी, आणि घाटिवळे धरणाची क्षमता 0.235 दलघमी इतकी आहे. या तीनही धरणातील पाणीसाठा संपला असून, एमआयडीसीच्या ग्राहकांना हरचिरी आणि निवसर धरणाचा आधार आहे. सुदैवाने या दोन धरणांमध्ये 6 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.
हरचिरी धरणात 0.297 दलघमी तर निवसर धरणात 0.211 दलघमी इतका पाणीसाठा आहे. प्रतिदिन 9 दलघमी पाणीपुरवठा करावा लागतो. रत्नागिरी नगर परिषदेच्या मागणीनुसार एमआयडीसीच्या धरणातील पाणी दिले जाते. त्याचवेळी 9 ग्रामपंचायती रत्नागिरीतील एमआयडीसी किंवा औद्योगिक क्षेत्रसह 250 खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर आहे. हरचिरी आणि निवसर धरणातील पाणीसाठ्यानुसार हे पाणी 6 जून पर्यंत पुरवठ्यास येईल, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.