एका आठवड्यात महावितरणची २ कोटीची थकबाकी वसूल

रत्नागिरी:- महावितरण कंपनी ॲक्शन मोडवर आहे. कंपनीने थकबाकीदार ग्राहकांवर कठोर कारवाई करत वीजजोडण्या तोडल्या आहेत. मार्च महिन्यात १ हजार ३१५ वीज ग्राहकांची विद्युत जोडणी कायमस्वरूपी तोडली आहे. ३९५ ग्राहकांची जोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली आहे. कारवाईच्या भितीने आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे २ कोटीची थकबाकी वसूल झाली आहे. १५ कोटी ६२ लाखावरून आता १३ कोटी ९२ लाख एवढी थकबाकी शिल्लक आहे.

मार्च महिना संपत आला तरी अजूनही महावितरणची थकबाकी मोठी आहे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही वसुली न झाल्याने महावितरणने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात १ हजार ३१५ ग्राहकांची जोडणी तोडण्यात आली आहे. या ग्राहकांना पुढील ६ महिने कंपनी वीज जोडणी देणार नाही. त्यानंतर त्या ग्राहकांना नवीन जोडणीसाठीच अर्ज करावा लागणार आहे. ३९५ ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली आहे. बील भरल्यानंतर त्यांना पुन्हा वीज जोडून दिली जाणार आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील ४५ हजार ३२१ ग्राहकांकडे १५ कोटी ६२ लाखाची थकबाकी होती. आज २७ हजार ३७९ ग्राहकांकडे १३ कोटी ९२ लाख रुपये थकित आहेत.