रत्नागिरी:- गेल्या दोन दिवसांपासून दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. हीच परिस्थिती पुढे आठ दिवस कायम राहिली तर पहिल्या टप्प्यातील हापूसला चट्टे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हापूस कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर येत आहे. त्यामुळे मे महिन्यात बंपर हापूस पिक बागायतदारांच्या हाती लागण्याची आशा आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
हापूस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन यंदा कमी राहील, हे निश्चित झाले आहे. यंदा मोहोरच कमी आल्यामुळे बागायतदार निराश झाले आहेत. पुढील टप्प्यांमध्ये येणार्या उत्पादनावर सगळी भीस्त राहणार आहे. त्यादृष्टीने बाजारातील दर स्थिर राहावा, अशी प्रार्थना बागायतदारांकडून केली जात आहे. यंदा ढगाळ वातावरणाचा कालावधी कमी राहिला आहे. त्यामुळे यावर्षी कलमे फुटलेली नव्हती. रोगराईही नव्हती. थ्रीप्सचा प्रादुर्भाव पावस, गणेशगुळे परिसरात आढळून आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. त्यावर फवारणी करावी लागली. मोहोराचा अभाव आणि कोरेडे हवामान यामुळे बागायतदारांचा जानेवारी महिन्यात दोन ते तीन फवारणींचा खर्च वाचला. अमावास्या, पौर्णिमेला कीटकांच्या वाढीला पोषक वातावरण असल्यामुळे त्या अंदाजाने दरवर्षी फेब्रुवारीपर्यंत 7 ते 8 फवारणी केल्या जातात. मात्र मोहोर येऊ लागल्यामुळे भविष्यात फवारणीचा खर्च सुरू होणार आहे.
गेले तीन दिवस जिल्ह्यातील तापमान 34 अंशावर पोहोचले आहे. उष्म्याची लाट येण्याची शक्यता वर्तविली असून सलग दुसर्या दिवशी पारा स्थिर आहे. हे वातावरण असेच राहिले तर सुरुवातीचा टप्प्यातील आंब्याला चटका बसू शकतो. जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर वेगाने येत आहे. परिणामी मे महिन्यात बंपर पिक येणार आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा कमीच राहील, अशी शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे. एकाचवेळी आंबा बाजारात आला तर दर घसरतील, अशी भीती व्यक्त होत आहे.