उपासमारीमुळे मच्छिमारांना आत्महत्या, आत्मदहनाशिवाय पर्याय नाही; मच्छीमारांनी व्यक्त केल्या भावना

रत्नागिरी:- काँग्रेसच्या राज्य मच्छिमार सेलचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्यासमोर आंदोलनकर्ते मच्छिमारांनी शनिवारी आपल्या व्यथा आणि मासेमारांसमोरील समस्या मांडल्या. पर्ससीन नेट मच्छिमारांचे नेते नासीर वाघू यांनी तर आता उपासमारीमुळे मच्छिमारांना आत्महत्या किंवा आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. यावर काँग्रेसचे मच्छिमार नेते नाखवा यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री असलम शेख यांच्याशी बैठक लावून मार्ग काढून देण्याचे आश्‍वासन दिले.


पर्ससीन मच्छिमार आणि नौका मालकांनी 3 जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन सुरू आहे. याठिकाणी राज्य मच्छिमार सेलचे मार्तंड नाखवा, काँग्रेस ओबीसी सेलचे नेते दीपक राऊत, अल्पसंख्याक नेते हारिश शेखासन, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा आदींनी भेट दिली. यावेळी मझहर मुकादम यांनी पर्ससीन मच्छिमारांना संपवण्याचा कट कसा रचला जात आहे याची माहिती दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनातील सुधारणा कशा जाचक आहेत हे सांगितले.

पर्ससीन मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी तर मत्स्य व्यवसाय विभागासह सागरी सुरक्षा पोलिसांकडूनही कारवाई केली जात आहे, असे सांगितले. पोलिसांना हे अधिकार आहेत की नाहीत? हे पाहणे आवश्यक असून, आतापर्यंत पोलिसांची कारवाई होत नव्हती, असे वाघू यांनी सांगून येत्या दोन-तीन दिवसात अपेक्षित निर्णय न झाल्यास मच्छिमारांसमोर आत्महत्या किंवा आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे मत मांडले.

मच्छिमारांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय मंत्र्यांशी संपर्क साधून मार्ग काढूया, असे काँग्रेसचे राज्य मच्छिमार सेलचे नेते नाखवा यांनी आश्‍वासन दिले. मी काँग्रेसचा असून, काँग्रेसचेच मंत्री असलेले ना. असलम शेख यांची काही अधिकार्‍यांकडून दिशाभूल केली जात असल्याचे नाखवा यांनी सांगितले. मंत्र्यांसमोर सत्य परिस्थिती मांडून लवकरच काहीतरी मार्ग काढू असे आश्‍वासन दिले.

मच्छिमार नेते नासीर वाघू यांच्यासह नुरूद्दीन पटेल, बिलाल सोलकर, किशोर नार्वेकर, प्रतिक मोंडकर, आजिम चिकटे यांनीही मार्तंड नाखवा यांच्यासमोर मच्छिमारांच्या अडचणी मांडल्या. काँग्रेसचा मच्छिमार प्रतिनिधी म्हणून मी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांशी संपर्क साधून बैठक लावतो. मच्छिमारांची पाच जणांची कमिटी करा. या कमिटीसोबत मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मार्ग काढू, असे आश्‍वासन मार्तंड नाखवा यांनी दिले.