रत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सध्या 3 गावातील 3 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या भविष्यात वाढेल असे जिल्हा परिषद पाणी पूरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात सरासरी नोंद अन्य जिल्ह्यांपेक्षा अधिक होते. तरीही दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने पाणी पूरवठा योजनांची कामे हाती घेतली आहेत. त्याला पुढील दोन वर्षात यश येईल. जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यात टॅंकरने पाणी पूरवठा करण्यात सुरवात होते. यावर्षी पहिला टँकर हा नियमाप्रमाणे खेडमध्ये धावला आहे. खेड तालुक्यातील केळणे धनगरवाडीत टँकरने पाणी देण्यास सूरवात झाली. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील अडरे धनगरवाडी, लांजा तालुक्यातील चिंचवटी धावडेवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळी हळु हळू कमी होत आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जलजीवन मिशनमुळे जिल्ह्याचा यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. यंदाच्या आराखड्यानुसार पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी 5 कोटी 73 लाख रुपयांची गरज भासणार आहे. गतवर्षी हाच आराखडा 11 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे यावर्षी हा आराखडा निम्म्यावर आला आहे.