उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले: रामदास कदम

रत्नागिरी:- खोके..खोके.. बोलून बाप-बेटे थकले आहेत पण लक्षात ठेवा, आम्ही तोंड उघडले तर मध्यरात्री २ वाजता उठून हा देश सोडून पळून जावे लागेल. जे बाळासाहेबांनी कमावलं होतं ते तुम्ही गमावलं आहे. उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासला आहे, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले आणि तुम्हीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यावेळी आम्ही तोंड उघडू त्यावेळी श्रीलंका, लंडन, अमेरिका आदी देशात तुमचे काय आहे? हे उघड करु, असा इशारा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या आभार मेळाव्यासाठी शिवसेना नेते रामदासभाई कदम रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी आपल्या तडाखेबंद वक्तृत्व शैलीने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. शिवसेना पक्ष वाढवण्यात कोकणच्या कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा होता, हे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले.

शिवसेनेच्या आभार मेळाव्यात रामदासभाई कदम यांची पुन्हा एकदा तोफ धडाडली. अपेक्षेप्रमाणे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. शिवसेनेत त्यावेळी सामान्य कार्यकर्त्याला कशी वागणूक मिळायची? ते सार्‍यांनाच माहित आहे. आज याठिकाणी भव्य वादळ पाहून पुन्हा बाळासाहेबांची आठवण आल्याचे रामदासभाई यांनी सांगिले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब नेहमी सांगायचे.. माझ्या पक्षाची कॉंग्रेस कधीच होऊ देणार नाही पण हे महाशय बाळासाहेबांचे विचार तुडवून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळेच शिवसेना फुटली. तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन फार मोठी चूक केलीत. तुम्ही मुख्यमंत्रीपद घेतले नसते तर शिवसेना, भाजप महायुती अभेद्य राहिली असती.

आजवर मी कधी दौर्‍यावर यायचो त्यावेळी उदय सामंत वेगळ्या पक्षात होते पण त्यांच्यावर मी कधी टीका केली नाही. त्याचे कारण आज मी स्पष्ट करतो असे म्हणत रामदासभाई म्हणाले की, मला माहित होते एक ना एक दिवस हा उदय शिवसेनेचा भगवा हाती घेईल.

आमच्यावर सातत्याने टीका झाली. खोके..खोके बोलून आता बाप-बेटे थकले आहेत. ४० आमदार तुम्हाला सोडून जातात. यातच कळते की तुमची औकात काय आहे? मी तुम्हाला आज सांगतोय, त्यांच्यासोबत जे काही उरले सुरलेले १०-१५ लोक आहेत ते देखील इकडे येतील आणि बाप-बेटे दोघेच राहतील, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

माझ्या कारकिर्दीत मी १० मुख्यमंत्री पाहिले आहेत मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही. कधी कधी दोन पावलं मागे जाऊन चार पावलं पुढे जायचं असतं, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्‍वास शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष बसेल, असा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.