रत्नागिरी:- विविध प्रलंबित मागण्या मंजूर झाल्यामुळे 21 दिवस सुरू असलेला आशा व गटप्रवर्तकांचा बेमुदत संप अखेर मागे घेत असल्याचे गुरुवारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी जाहीर केले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत 8 नोव्हेंबरला झालेल्या चर्चेत प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने आज घेतला.
राज्यातील 72 हजार आशा व 3672 गटप्रवर्तक 18 ऑक्टोबर 2023 पासून संपावर होत्या. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना सात हजार रुपये व गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढ व आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दीपावली भेट जाहीर केली होती; मात्र गटप्रवर्तकांना आशांच्या तुलनेने कमी वाढ जाहीर केल्यामुले व कंत्राटी दर्जाबाबत निर्णय न केल्याने गटप्रवर्तक व आशांमध्ये असंतोष होता. त्यामुळे कृती समितीने संप सुरूच ठेवला होता. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या दालनात 3 नोव्हेंबरला कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ व कंत्राटी कर्मचारी दर्जाबाबत शासनाने निर्णय घ्यावा, असे निर्णय झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी कृती समितीच्या नेत्यांना दरेबुद्रुक येथे भेटावयास निमंत्रित केले होते. त्यांनी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत पाठवा, असे फोनवर सांगितले. 8 ला राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे जॉइंट सेक्रेटरी डॉ. अशोक बाबू यांना राज्य सरकारतर्फे पत्र लिहून आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात केंद्र सरकारने वाढ करावी तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जाबाबत देण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे.
संपाबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार गोडसे यांनी अप्पर मुख्य सचिव म्हैसकर यांच्याबरोबर कृती समितीची बैठक आज मुंबईत घेतली. गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जाबाबत राज्य सरकारतर्फे शिफारस केंद्राकडे केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीचा व आशांना 7 हजार रुपये वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. कृती समितीने संप मागे घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार कृती समितीने संप मागे घेण्याचे मान्य केले. या बैठकीला संघटनेचे शंकर पुजारी, राजू देसले, एम. ए. पाटील, डॉ. डी. एल. कराड, आनंदी अवघडे, भगवान देशमुख उपस्थित होते.