चिपळूण:- ठाणे येथे स्थापन झालेल्या एका मल्टिस्टेट कंपनीने चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कालिकाई संपर्क सेवा समितीने याबाबत थेट आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत चालढकल होत असल्याने समितीने आता थेट गृहमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, चिपळूण तालुक्यात प्रथम कालिकाई इंडिया (ई) लिमिटेड ही संस्था स्थापन करण्यात आली. नंतर याच संस्थेला चक्क राष्ट्रीय दर्जा देण्याच्या नावाखाली २०१४ साली संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो.अशी राष्ट्रीयकृत नोंदणी करण्यात आली. नव्या योजनेने कामकाज सुरू करण्यात आले.
राष्ट्रीयकृत आणि शेतीविषयक संस्था असल्याने गुंतवणूकदारांनी मोठी पसंती या मल्टिस्टेट कंपनीला दिली. चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारोंनी या कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीचा कारभार मुंबईतील वडाळा येथील कार्यालयातून सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले. नंतर मात्र अनेक मल्टिस्टेट कंपन्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली. गुंतवणूकदारांचे पैसे देता येत नसल्याने संचालक मंडळाने चालढकल सुरू केली, अशी माहितीही राजेश सावंत यांनी दिली आहे.
हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद शिरीशकर यांच्या अध्यक्षतेखाली कालिकाई संपर्क सेवा समिती या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने १० जून २०२१ रोजी तक्रार दाखल केली असून, संबंधित संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण माटुंगा येथील पोलीस उपायुक्तांकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या मल्टिस्टेट कंपनीचे सुमारे १ लाखाहून अधिक सभासद असून, किमान १०० ते १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चिपळूण, रत्नागिरी, मुंबई अशा कोकणपट्ट्यातील लोकांनी ही गुंतवणूक असून, कोकणातील लोकांची ही सर्वांत मोठी फसवणूक ठरणार आहे. त्यामुळे कालिकाई संपर्क सेवा समिती शेवटपर्यंत लढा लढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे राजेश सावंत यांनी म्हटले आहे.