राजापूर:- तालुक्यातील आडिवरे (वाडापेठ) पंचक्रोशीत नेहमी गजबजलेल्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायतीचे कार्यालयच चोरट्याने फोडून हजारो रुपयांवर डल्ला मारला आहे. दरम्यान या घटनेची माहिती नाटे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला आहे.
याबाबतची फिर्याद वाडापेठ ग्रामसेविका सौ.सारिका किसन लांजेकर (वय – ३१,रा. देवाचेगोठणे) यांनी नाटे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी ५.३० ते १८ ऑक्टोबर रोजी ०८.४५ वा.चे दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत वाडापेठ (आडिवरे) ता. राजापूर येथील ७९,४१६/- रोख रक्कम चोरीस गेली आहे. हि रक्कम घरपट्टी आणि पाणी पट्टीची असून दरवाजाचे व लोखंडी कपाटाचे कुलूप काढून लॉकर मधील रक्कम चोरून नेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान रत्नागिरी येथील रेम्बो श्वान व अंगुलीमुद्रा तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच नाटे पोलिस ठाण्याचे घटनास्थळी सहा. पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी,पोहवा जाधव,चव्हाण, पोकॉ काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत.