आठवड्याला पाच हजाराची खंडणी दे नाहीतर तुला सोडणार नाही

खंडणीसाठी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकी

रत्नागिरी:- तुला व्यवसाय करायचा असेल तर आठवड्याला पाच हजारांची खंडणी दे नाहीतर तू, तुझा भाऊ आणि तुझ्या कामगारांना सोडणार नाही. अशी धमकी देत शहरातील आठवडा बाजार येथील हॉटेल गणेशच्या मालकांना दोघांनी धमकी देत आठवड्याला पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी मनोज तांडेल आणि आशु सावंत या दोघांवर भा द वि कलम 387 नुसार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी दुपारी आठवडा बाजार येथील  हॅाटेल गणेश मध्ये येवून मनोज तांडेल आणि आशु सावंत यांनी हॉटेल मालक कुलकर्णी यांना खंडणी साठी धमकावले. आठवड्याला पाच हजारांची खंडणी दे नाहीतर तुला, तुझ्या भावाला आणि कामगारांना देखील बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली. खंडणी देण्यास  विरोध केल्यावर शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी ही दिली त्यांच बरोबर हॅाटेल मधील स्टाफला काम न करण्याची धमकी  दिली. 
हॉटेल चालक कुलकर्णी यांनी शहरातील पोलिस चौकीत रितसर तक्रार दाखल केली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.