संगमेश्वर:- २२ जुलैपासून दरड कोसळल्याने तसेच रस्ता खचल्याने बंद असणारा आंबा घाट उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. उद्या (गुरुवार) पासून लहान चारचाकी गाड्या, दुचाकी, रिक्षा, पिक अप, ॲम्बुलन्स आदी साठी वाहतूक सुरू होणार आहे.
राष्ट्रीय हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मान्यतेने वाहतूक सुरू आहे.आंबा घाटात १० पेक्षा जास्त ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या तसेच रस्ता खचला असल्याने घाट बंद झाला होता.
दिनांक २३ जुलै पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबा घाटातील दरडी बाजूला करण्याचे काम सुरू केले व ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी नवीन रस्ता करण्याचे काम आज अखेर पूर्ण झाले.
त्यामुळे राष्ट्रीय हायवे,सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून रस्ता सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.रत्नागिरीहून कोल्हापूर कडे जाताना प्रारंभी साखरपा चेकपोस्ट तसेच आंबा घाट समाप्ती शासकीय विश्रामगृह आंबा ह्या ठिकाणी सुमारे १० फुटाच्या कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत.
अवजड वाहतूक बंद ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.त्यामुळं अवजड वाहतूक अनिश्चित काळासाठी बंदच ठेवण्यात आली आहे.ह्या मार्गावर साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे कर्मचारी,वाहतूक शाखा कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.
आंबा घाट सुरू झाल्याने लहान चारचाकी वाहनधारक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.मात्र अवजड वाहतूक बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.तसेच एस टी वाहतूक देखील बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे उद्यापासून आंबा घाट लहान गाड्यांसाठी सुरू होणार असे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी कौशिक रहाटे यांनी सांगितले.