लांजा:- ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने एरटीगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून खाली कोसळली. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्याने झालेल्या या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालकासह कारमधील दोघेजण अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे चालले होते. तर ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. यादरम्यान आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक विजय सावंत यांना आपल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक फेल झाले असल्याने आणि याच दरम्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी गाड्यांची रहदारी असल्याने ट्रक थांबवायचा कसा असा मोठा प्रश्न ट्रक चालक सावंत यांच्यासमोर निर्माण झाला होता. तरीही मोठ्या शिताफीने त्यांनी त्याही स्थितीत ट्रक आंजाणारी पुलापर्यंत आणला. मात्र सिमेंट भरले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या एरटिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली . या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. याबरोबरच इरटीका कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे ( वय 61 ) यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे ( वय 29 ) आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे ( वय 65 ) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी तसेच मृत प्रवाशांना लांजा पोलीस व ग्रामस्थांच्यावतीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.