अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य; 78 वर्षांच्या वृद्धाला 20 वर्ष सश्रम कारावास

रत्नागिरी:- सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करणाऱ्या 78 वर्षांच्या वृद्धाला न्यायालयाने अशा प्रकरणातील जिल्ह्यातील सर्वात मोठी 20 वर्ष सश्रम कारावास आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. ही  घटना 16 मार्च 2019 रोजी दुपारी 12 वा. सुमारास मठवाडी येथे घडली होती.

गोविंद हरिश्चंद्र मणचेकर (78, रा. दळे मठवाडी, राजापूर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार,16 मार्च रोजी दुपारी पीडित अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत होती. ती एकटीच असल्याची संधी साधत आरोपीने तिच्याशी गैरकृत्य केले. पीडितेने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगताच त्यांनी तातडीने नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तत्कालीन पोलीस निरीक्षक लोकेश कानसे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. एस. मांगले यांनी तपास करून  गोविंद मणचेकर विरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.गेले दीड वर्ष हा खटला न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी, अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी 7 साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सोमवारी यावर निकाल देताना पोक्सो न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. ए. राऊत यांनी ही शिक्षा सुनावली.त्यानुसार भादंवि कलम 376 नुसार 20 वर्ष  कारावास आणि 10 हजार रुपये दंड,पोक्सो कलम अन्वये सेक्शन 4नुसार 7 वर्ष शिक्षा आणि 5 हजार दंड,सेक्शन 6 नुसार 10 वर्ष शिक्षा आणि 5 हजार दंड, तसेच सेक्शन 8 नुसार 3 वर्ष शिक्षा आणि 1हजार दंड अशी एकूण 20 वर्ष आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.