अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणाला 20 वर्षांचा कारावास 

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी 20 वर्ष कारावास आणि 37 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली होती.

संदेश सुरेश गुरव (27,रा.चांदेराई,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीतेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, संदेश गुरवचे पिडीतेच्या घरी येणे-जाणे होते.यातूनच त्याने पिडीतेला त्याचे लग्न झालेले असूनही लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी सप्टेंबर ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अत्याचार केला. त्यानंतर त्याने पिडीतेला मी तुझ्याशी लग्न करणार नाही तसेच तुला व तुझ्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत पिडीतेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ग्रामीणच्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास करुन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्त विशेष न्यायाधिश वैजयंती ए.माला यांनी आरोपी संदेश गुरवला 20 वर्ष कारावास आणि 37 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून 11 साक्षिदार तपासले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून संजीवनी मोरे,सुनिल आयरे यांनी काम पाहिले आहे.