अयोग्य क्रिडा प्रमाणपत्रामुळे शिक्षक अपात्र

रत्नागिरी:-  क्रिडा स्पर्धेत प्राविण्याचा आधार घेऊन नोकरीसाठी पात्र ठरलेल्यांपैकी प्रमाणपत्र अयोग्य ठरल्यामुळे अपात्र ठरलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे. त्या उमेदवाराला नियुक्ती देण्यापुर्वी हा प्रकार पुढे आला आहे. याला शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.

शासनातर्फे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी क्रीडा विभागातील अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमलेली होती. राज्यभरातून विविध विभागातील पदांसाठी परिक्षांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे या समितीद्वारे तपासली जात आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेत 2010 मध्ये शिक्षक पदासाठी निवड झालेल्या एका उमेदवाराची क्रीडा प्राविण्यातील कादगपत्रे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली होती. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्यांना क्रीडा कोट्यातून नोकरी दिली जाते. संबंधित उमेदवाराचे प्रमाणपत्र अपात्र ठरले असून त्याला नियुक्ती दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.