अपुऱ्या निधीअभावी ‘उमेद’ झाली नाउमेद

रत्नागिरी:- अपुर्‍या निधी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या उमेद अभियानाची गती मंदावणार आहे. कोरोनामुळे निधी कपात करून जिल्ह्यांना अवघा तीस टक्केच निधी मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गटांना शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी जिल्ह्यातील 1800 बचत गटांचे प्रस्ताव निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्याला 19 कोटी रुपये मिळतात. जून महिन्यात शासनाकडून आलेल्या पत्रानुसार यंदा आठ कोटी निधीवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यातील दोन कोटी सुरवातीला आले होते. अजून सहा कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेद अभियानासाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के आणि राज्य शासनाकडून 40 टक्के निधी दिला जातो. 2 कोटीतून 189 गटांना भांडवलासाठी रक्कम वाटप करण्यात आली. मानधन आणि कार्यालयीन भाडे देण्यात आले. नव्याने स्थापन केलेल्या गटांना खेळते भांडवल, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य खरेदीला उर्वरित निधी येणे आवश्यक आहे. निधी कमी आल्यास या चळवळीची गती कमी होणार आहे.

उमेद अभियानातून नवीन गटांना खेळते भांडवल म्हणून प्रत्येक गटाला 15 हजार रुपये दिले जातात. सध्या जिल्ह्यात 1400 नवीन गट स्थापन झालेत. सहा महिने झाल्यानंतर समुदाय गुंतवणूक निधीतून प्रत्येक गटाला 60 हजार रुपये दिले जातात. सध्या अडीचशे गट या निधीसाठी पात्र आहेत. ग्रामसंघाला 75 हजार रुपये मिळतात. त्याचे तीस प्रस्ताव आहेत. साहित्य खरेदीसाठी 40 हजार ते 70 हजार रुपये गटांना मिळतात. सध्या प्रस्तावच मागवण्यात आले नाहीत. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 16 हजार 925 गट स्थापन करण्यात आले असून त्यातील 12 हजार गटांना बँकेकडून कर्ज सुरू आहे. एका गटाला वर्षाला सरासरी दीड ते पावणेदोन लाख रुपये उमेदमधून अनुदान रूपाने मिळतात.