अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयतावरच गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून दुचाकीवर मागे बसलेल्या सहकाऱ्याच्या दुखापातीसह स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी मयत दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.हा अपघात २८ ऑगस्ट रोजी चांदोर फाटा येथे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन रामचंद्र गुरव ( वय- २९ रा.गव्हाणे,लांजा ) पावस सापुचेतळे मार्गे गव्हाणे येथे जाण्यासठी २८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास  दुचाकी घेऊन निघाला होता.त्यांची दुचाकी चांदोर फाटा येथे आली असता सचिन याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला होता.

या अपघातात सचिन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता.तर दुचाकीवर मागे बसलेला रुपेश पांडुरंग गुरव ( वय-२८ रा.गव्हाणे लांजा)  हा गंभीर जखमी झाला होता.या प्रकरणी संदेश चव्हाण ( पोहेको पूर्णगड पोलीस स्थानक) यांनी त्याबाबतची तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी मयत सचिन रामचंद्र गुरव याचे विरोधात भा.द.वी.क. ३०४ (अ),२७९,३३७,३३८,मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याचा पुढील तपास पोहेको चव्हाण करीत आहेत.