संगमेश्वर:- बोलेरो पलटी होऊन चारजण जखमी झाल्याची घटना दि. ७ एप्रिल रोजी घडली होती. संगमेश्वर बसस्थानकासमोर झालेल्या या अपघातप्रकरणी बोलेरो चालकावर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे यांनी दिली आहे. अनंत राजाराम गुरव ( रा. आरवली गुरववाडी ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे . अनंत गुरव हे आपल्या ताब्यातील बोलेरो ( एमएच ०६ एजी ९९४३ ) गाडीतून बैलगाडी शर्यतीसाठी आरवली ते मलकापूर जात होते. त्यांच्याजवळ जनावरे वाहतुकीचा परवाना नव्हता. संगमेश्वर बसस्थानक वळणाजवळ बोलेरोवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो पलटी झाली. या अपघातात अनंत राजाराम गुरव, अविनाश तुकाराम गुरव, प्रवीण विठ्ठल गुरव, विजय तुकाराम गुरव (सर्व रा . आरवली गुरववाडी , संगमेश्वर) हे जखमी झाले आहेत. नुकसानाबरोबरच एका बैलाच्या पायाला दुखापत झाली आहे.