अनाधिकृतपणे पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणार्‍या दोन नौकांवर कारवाई

नौकांवरील 30-35 खलाशांसह तांडेल ताब्यात

रत्नागिरी:-/सागरी सुरक्षा दलाने रत्नागिरी समुद्रात दोन वावाच्या आतमध्ये अनधिकृतपणे पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणार्‍या गोवा राज्यातील दोन नौकांवर धडक कारवाई केली आहे. त्या दोन्ही नौका पकडून मत्स्यविभागाच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

अनधिकृतपणे रत्नागिरी समुद्रात मासेमारी करणार्‍या परराज्यातील या नौका रत्नागिरी सागरी सुरक्षा पोलीस दलाचे एपीआय केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष पाटेकर, पीएसआय मनोज कुमार सिंग, एसआय कैलास भांडे, एसआय पी. के. सारंग, विनोद शांताराम महाडिक, पोलीस कान्स्टेबल मुख्यालय व सुरज जाधव या टीमने कारवाई करत ‘मिसीसीपी 1’ व ‘स्टार ऑफ विलीनकिनी 2’ या दोन नौका पकडून रत्नागिरी मत्स्य खात्याचे अधिकारी श्री.पाठारे यांच्या ताब्यात दिल्या. या दोन्ही नौकांवर तांडेलसह सुमारे 30-35 खलाशी मत्स्यविभागाच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईनंतर दोन्ही नौका रत्नागिरीतील भगवती बंदरात आणून नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत.
 त्यावरील खलाशी लोकांवर पुढील कायदेशीर कारवाई मत्स्य विभागाकडून करण्यात येईल, अशी माहिती मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.